जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची
४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड

ॲग्रीस्टॅक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी
-जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक

सातारा दि. 20- शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात ३८ हजार ३९० शेतकऱ्यांची ४१ हजार ४२१ कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत. या योजनेच्या लाभासाठी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झालेली नसेल त्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबधंक संजयकुमार सुद्रीक यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी शेतकरी  अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार थकीत कर्जाच्या दुष्ट चक्रात तो अडकत  आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना शासन राबवित आहे. यासाठी शासनाने दिनांक 2 जून 2026 रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयाद्वारे, 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली असून दिनांक 15 जुलै 2026 रोजीच्या शासन पूरकपत्राद्वारे सदर योजनेच्या निकषात बदल केला असून काही अटी वगळल्या आहेत. 

त्यानुसार या योजनेत कर्जमुक्ती, एक वेळ समझोता, व प्रोत्साहन पर लाभ अशा स्वरूपात कर्जमाफी योजनेचा लाभ देणार असून कर्जमुक्तीमध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची, तसेच सदर कालावधीतील पुनर्गठन/फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दि. 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची त्यांच्या कर्ज खात्यात रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या वरील निकषानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाही रू.2 लाखापर्यंत लाभ मिळणार आहे.

एक वेळ समझोता स्वरूपात लाभ देताना दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची, तसेच सदर कालावधीतील पुनर्गठन/फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परत फेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम रू.2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याने प्रथम रू. 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड केल्यास एकवेळ समझोता अंतर्गत रू.2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल.

प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत सन 2022-23, सन 2023-24 व सन 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर विहित मुदतीत कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रती शेतकरी रू. 50 हजार इतक्या अधिकतम रकमेपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. मात्र अशा शेतकऱ्याने सन 2025-26 मध्ये पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे आवश्यक असेल. सन 2026-27 या आर्थिक वर्षाची अट वगळण्यात आलेली आहे.

सातारा जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. सातारा बँक विकास संस्थामार्फत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज देत असून जिल्ह्यातील विकास संस्थांचे सदर योजनेअंतर्गत एकूण 38812 सभासदांची एकूण 41881 कर्ज खाती आहेत. सदर कर्ज खात्यांपैकी मयत 416 सभासदांची 451 कर्ज खाते व आधार क्रमांक नसलेली 9 सभासदांची 9 कर्ज खाते वगळता उर्वरित 38390 शेतकऱ्यांची 41421 कर्ज खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत. 

या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार असून कर्जमुक्तीसाठी पात्र लाभार्थी शेतक-यांची यादी प्रसिध्द होणार असून आहे.  पात्र शेतक-यांच्या यादया प्राप्त होताच गावातील तलाठी, ग्रामसेवक व संस्थेच्या सचिवामार्फत गावामध्ये प्रसिध्द करणेत येतील. तसेच बँकांच्या शाखेमध्ये सुध्दा यादी प्रसिध्द केली जाईल.  पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, लोकसेवा केंद्र किंवा बँक शाखेमध्ये ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक सह आधार प्रमाणिकरण केल्यानंतर त्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या सदर बँक खाती जमा होणार आहे. शेतक-यांच्या माहितीमध्ये विसंगती असल्यास पडताळणी केंद्रावरच तशी पोर्टलवर विसंगतीबाबत नोंद करणे आवश्यक आहे. सदर विसंगती दुरुस्ती करुन झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम शेतक-याच्या कर्ज खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधक श्री. सुद्रीक यांनी दिली.

Review