शिरवळ पोलिसांची वाहतूक नियमांविरोधात धडक मोहीम
एका तासात 36 वाहनांवर कारवाई; सुमारे 39 हजारांचा दंड
शिरवळ पोलिसांची वाहतूक नियमांविरोधात धडक मोहीम
एका तासात ३६ वाहनांवर कारवाई; सुमारे ३९ हजारांचा दंड
पोलीस निरिक्षक यशवंत नलावडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ६ मे २०२६ रोजी सायंकाळी शिरवळ पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अवघ्या एका तासात तब्बल ३६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहनधारकांकडून सुमारे ३९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
या कारवाईदरम्यान दुचाकीवर तीन जण प्रवास करणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे, तसेच नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर चालवणे अशा विविध प्रकारचे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे प्रकार आढळून आले. संबंधित वाहनांवर तात्काळ ऑनलाइन चलन काढून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
विशेषतः नंबर प्लेट नसलेली वाहने रस्त्यावर चालविण्याचा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. वाहनाची ओळख पटविण्यासाठी नंबर प्लेट हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र काही वाहनचालक जाणूनबुजून नंबर प्लेट न लावता अथवा ती अस्पष्ट ठेवून वाहने रस्त्यावर आणताना दिसत आहेत. अशा वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अशाच एखाद्या वाहनाचा वापर करून गंभीर गुन्हा, दरोडा किंवा आतंकवादी स्वरूपाची घटना घडल्यास त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे नंबर प्लेट नसलेली वाहने ही केवळ वाहतूक नियमभंगाची बाब नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिरवळ पोलिसांनी राबविलेली ही मोहीम केवळ दंड वसुलीसाठी नसून नागरिकांच्या सुरक्षेसाठी असल्याचे या कारवाईतून स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे ही अत्यंत धोकादायक बाब मानली जाते. क्षणभराचे दुर्लक्ष देखील भीषण अपघाताला कारणीभूत ठरू शकते. अशा अपघातांमध्ये वाहनचालक गंभीर जखमी होण्याची किंवा प्राण गमावण्याची शक्यता असते.
त्याहून गंभीर बाब म्हणजे निष्काळजी वाहनचालकामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवताना एखाद्या पादचारी किंवा दुसऱ्या वाहनधारकाला धडक बसल्यास त्यांना विनाकारण जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक आणि नैतिक कर्तव्य असल्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.
अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या वाढत्या प्रकाराबाबतही पोलिसांनी चिंता व्यक्त केली. कायद्यानुसार अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी नसताना काही पालक निष्काळजीपणे मुलांच्या हाती वाहन देत असल्याचे दिसून येते. अनुभवाचा अभाव आणि बेफिकीर वाहनचालना यामुळे अशा घटना त्यांच्या स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात.
नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर पुढे नेमकी कितपत कठोर कारवाई होते, संबंधित वाहनचालकांवर नियमांनुसार गुन्हे दाखल होतात का, की काही प्रकरणांमध्ये राजकीय अथवा अन्य दबावामुळे ही वाहने सोडली जातात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाहतूक शिस्तीबाबत पोलिसांनी घेतलेली ही भूमिका सातत्याने कायम राहिली तरच रस्त्यांवरील बेफिकीरपणाला आळा बसू शकणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, शिरवळ परिसरात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका नागरिकांमध्ये कौतुकचा विषय ठरत आहे. केवळ कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी कठोर पण आवश्यक भूमिका घेतल्याचे दिसून आले. वाढत्या बेफिकीर वाहनचालनेला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण मोहिमा राबविण्याची गरज असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.